सातारा कोल्हापूर आणि तंजावर या तिन्ही गादीचे छत्रपती उद्या येणार एकत्र

सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मोस्तव देशभर प्रसिद्ध आहे सर्व देशातून या ठिकाणी १२ जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने लोक राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्याकरिता येत असतात. यावर्षी जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम खास असणार आहे कारण या सोहळ्याला तीन प्रमुख छत्रपतींची उपस्थिती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सातारा कोल्हापूर व तंजावर येथील गाद्या चालवतात. या तिन्ही गादीचे राजे जास्त कधी एकत्र पाहायला मिळत नाहीत. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मराठा सेवा संघ दरवर्षी सिंदखेड राजा येथे भव्य राजमाता जिजाऊ जन्मउत्सव साजरा करते.दरवर्षी मोठमोठे मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावतात. या अगोदर उदयनराजे संभाजी राजे यांनी वेगवेगळ्या वर्षी हजेरी लावलेली आहे पण या वर्षी सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे , कोल्हापूर गादीचे युवराज छत्रपती संभाजीराजे आणि तंजावर येथील छत्रपती बाबाजीराजे भोसले हे एका मंचावर एकत्र येत आहेत. सर्व शिवप्रेमी मध्ये उत्सुकता आहे की तिन्ही घराण्याचे छत्रपती एकत्र आल्यावर काय भूमिका मांडतात.

Loading...

सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघातर्फे 1994 पासून या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. सिंदखेडराजा शहरातील जिजाऊ सृष्टीवर लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत या वर्षीचा सोहळा होणार आहे. सिंदखेड राजा येथे 3 जानेवारीपासून जिजाऊ सृष्टीवर सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू आहे. शुक्रवारी (ता. 12) दशरात्रोत्सवाचा समारोप होईल. गुरुवारी (ता. 11) जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर दीपोत्सव होणार आहे. राजवाडा परिसरात दीप लावले जाणार आहेत. 420 मशालींचा समावेश असलेली मशाल यात्रासुद्धा काढली जाईल. 12 जानेवारीला दुपारी 3 ते 6 या कालावधीमध्ये जिजाऊ सृष्टीवरील शिवधर्म पीठावर मुख्य कार्यक्रम होईल.

कार्यक्रमास छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले आणि छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांच्यासह नाना पटोले, छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील खेडेकर (न्यूयॉर्क), मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे, महासचिव इंजिनिअर मधुकर मेहकरे यांची उपस्थिती राहील. सायंकाळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय भाषण होईल.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ माँसाहेबांच्या ४२० व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी सिंदखेडराजा नगरी सजली असून लाखोंच्या संख्येने येथे भाविक जमणार असल्यामुळे कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे.१२ जानेवारीला सकाळी ६ वा. महापूजा. स.७ वा. भव्य पालखीसह वारकरी दिंडी,९ वा. शिवधर्म ध्वजारोहण, ९ ते १ शाहिरांचे पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष सत्कार, प्रकाशन सोहळा, सामूहिक विवाह सोहळा व सप्तखंजेरिवादक सत्यपाल महाराजच्या किर्तनासह अनेक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.