पानिपत स्मारक पाहून का हमसून हमसून रडले होते यशवंतराव चव्हाण.. त्यांनीच सांगितलेला हा किस्सा

यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते, त्यांच्या मोटारींचा ताफा पंजाबातून दिल्लीकडे येत होता. रस्त्यात एका मोठ्या गावात “पानिपत’ नावाचा नामफलक त्यांना दिसला. आपला प्रवास खंडित करून जेथे पानिपताचा समरप्रसंग घडला, त्या “काला आम’ नावाच्या ठिकाणी ते गेले. तेथे मराठी वीरांच्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधीच्या समोरच त्यांनी शेतात अचानक बसकण मारली. त्या रानची पांढुरकी माती त्यांनी आपल्या दोन्ही मुठींमध्ये धरली व कविहृदयाचे यशवंतराव हमसून हमसून रडू लागले. त्यांची ही अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची तारांबळ उडाली. भावनेचा पहिला पूर ओसरल्यावर आपल्या ओघळत्या अश्रूंना कसाबसा बांध घालत यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले, “”दोस्तहो, हीच ती पवित्र माती. राष्ट्रसंकट उद्‌भवल्यावर त्याविरोधात लढावे कसे, शत्रूला भिडावे कसे, याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे. आमच्या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येक घराघरामधला वीर इथे कोसळला आहे. त्यांच्या रक्ता-मांसानीच या मातीचे पवित्र भस्मात रूपांतर झाले आहे!”

Loading...

अगदी अलेक्‍झांडरपासून बाबर ते अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणे व्हायची ती याच रस्त्याने. अफगाणिस्तानातून, पंजाबातील सरहिंदकडून दिल्लीकडे सरकणारा हा रस्ताच जणू अनादी काळापासून रक्तासाठी चटावलेला आहे. पानिपतापासून अवघ्या काही कोसांच्या अंतरावर कुरुक्षेत्राची रणभूमी आहे. पानिपताचे तिसरे युद्ध अफगाण घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार, तारीख १४ जानेवारी १७६१ या दिवशी घडले. मध्ययुगीन कालखंडात सकाळी नऊ वाजल्यापासूनच संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. अलीकडे हिरोशिमा आणि नागासाकीवर दोन अमेरिकन अणुबॉंब पडले. त्यांच्या किरणोत्साराचा परिणाम होऊन एक-दीड लाख जीव मरायलाही दोन-तीन दिवस लागले होते. दिल्लीच्या बादशहाच्या म्हणजेच हिंदुस्थानच्या रक्षणाच्या उद्देशाने १७५२ च्या “अहमदिया करारा’नुसार मराठे एका ध्येयाने प्रेरित होऊनच पानिपतावर गेले होते. इथेच आमच्या लक्षावधी माता-भगिनींच्या बांगड्यांचा चुराडा झाला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला.

तेव्हा महाराष्ट्रात असे एकही देवघर शिल्लक उरले नसेल की, जिथल्या देवी-देवतांनी पानिपतावर खर्ची पडलेल्या वीरांसाठी आपले चांदीचे डोळे पुशीत अश्रूंचा अभिषेक केला नसेल!
पंढरीच्या वेशीमध्ये आषाढी-कार्तिकीला मराठा मातीतल्या साऱ्या दिंड्या-पताका एक व्हाव्यात तशा पानिपतावर शत्रूच्या बीमोडासाठी अन्‌ राष्ट्राच्या संरक्षणासाठी एक झालेला मराठी मुलूख उभा होता!’
पानिपत ही ऐन यौवनातल्या, मस्तवाल फाकड्या वीरांनी छेडलेली जीवघेणी जंग होती. आमचा शत्रू अहमदशहा अब्दाली हा तेव्हा जगातल्या बलाढ्य योद्ध्यांपैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी होता. या युद्धाच्या वेळी त्याची उमर अवघी बत्तीस होती; तर भाऊसाहेब पेशव्यांचे वय अठ्ठावीस होते. दत्ताजी शिंदे बाविशीचा, विश्‍वासराव आणि जनकोजी शिंदे तर सतरा वर्षांची मिसरूड फुटल्या वयाची पोरे होती. जेव्हा देशातील कोणत्याही नदीवर आजच्यासारखे पूल, रस्ते वा वाहतुकीची साधने नव्हती, तेव्हा सुमारे साठ हजार घोड्यांसह लाखाचा सेनासागर घेऊन बाहेर पडणे, या खायच्या गोष्टी नव्हत्या.

आम्ही झुंजलो दिल्लीच्या बादशहासाठी, हिंदुस्थानाच्या अभिमानासाठी. मात्र, दुर्दैवाने उत्तरेतल्या राजांनी मराठ्यांना मदत केली नाही. रजपूत राजे राजस्थानाच्या वाळूत लपून बसले. दुर्दैवाने या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हाला वाट्टेल ते करून धनधान्याची रसद गंगा-यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरवणारा गोविंदपंत बुंदेले ठार झाला अन्‌ तेथूनच अवकळा सुरू झाली. तरीही भाऊसाहेब पानिपताच्या मातीत गाडून उभे होते. मात्र, श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तव्याला जागले नाहीत. पुण्याहून कुमक आली नाही. पतियाळाचा अलासिंग जाट पंजाबातून कुमक पाठवत होता, ती पुढे कमी पडली. स्त्रिया-पोरांचे, यात्रेकरूंचे लटांबर सोबत असणे हे काळरूढीनेच भाऊंच्या पाठीवर लादलेले ओझे होते; पण त्यामुळे मात्र हातातल्या सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्याने तिळभर विश्रांती घेतली नाही.

शेवटी अन्नानदशा झालेली मराठी सेना झाडांची पाने आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली. कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले, यासाठी दुसऱ्या कोणा ऐऱ्यागैऱ्याची साक्ष काढण्याचे कारण नाही. ज्याच्याविरुद्ध आम्ही जंग केली, त्या आमच्या महाशत्रूनेच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे ः “”दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धादिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्‍चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्‍य!”

पानिपत जिल्ह्यातील एका गावाचेच नाव भाऊपूर असे आहे. मराठ्यांचा दारुण पराभव होऊन काही हजार कुटुंबे पळापळीनंतर उत्तरेतच स्थायिक झाली. कर्तृत्ववान बनली. त्यापैकी काही जणांनी उत्तर प्रदेशासारख्या बलाढ्य राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. पानिपताच्या युद्धाच्या वेळी आपले बापजादे यमुनाकाठी घिसाडघाईने कपाळमोक्ष करून घेण्यासाठी आले नव्हते, तर इकडे राष्ट्राच्या उत्थानासाठी आले होते, याच नवजाणिवेने आता तिकडे स्थलांतरित मराठ्यांमध्ये नवजागृतीची लाट आली आहे. युद्धाच्या वेळी मराठी लष्कराने पानिपताच्या किल्ल्यात रोजच्या पूजेसाठी भवानीचे छोटेसे मंदिर बांधले होते. त्याचा गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला आहे. अगदी शेवटच्या क्षणी केवळ अल्लातालाच्या कृपेने अब्दालीला तेव्हा तो विजय मिळालेला होता, त्याचे निशाण उराशी कवटाळताना त्याला धाप लागली होती. खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. आज अडीचशे वर्षांच्या दीर्घ पल्ल्यानंतरही या परिसरातले जोगी जमातीचे शाहीर आम्ही केव्हाच वेड्या ठरवलेल्या भाऊसाहेब पेशव्यांचेच पोवाडे आजही गातात; अब्दालीचे नव्हेत! पराजयाचा कलंक लागूनही कळीकाळानेच जणू भाऊसाहेबांना अमरत्वाच्या सिंहासनावर आरूढ केले आहे. आज “रोड मराठा’ या नावाने आपले बांधव त्या दूरदेशी लाखालाखांच्या संख्येने एकत्र येऊ लागले आहेत. हरियानात मेळावे भरवू लागले आहेत.!!!

अवश्य वाचा  बोलो पाटील.. और लढोगे? “क्यों नही? बचेंगे तो और भी लढेंगे” -शूरवीर दत्ताजी शिंदे