कुस्ती जिंकून आल्यावर मोठी मिरवणूक काढण्या ऐवजी अंत्ययात्रा काढावी लागली…

सांगली जिल्ह्यातील बलवडी खानापूरच्या कुस्ती मैदानात विजयची कुस्ती पाहिली होती.मैदानात जाताना तो आम्ही कोठे बसलोय हे पाहून आत गेला. त्यानं कुस्ती मारली आणि पळतच आमच्या दिशेनं आला. येऊन गावातील जेवढे लोक उपस्थित होते तेवढया लोकांच्या पाया पडला.त्या मैदानात कुस्ती त्यानं केलीती पण छाती आमची फुगली होती. त्यानंतर विजयच्या अनेक कुस्त्या मला बघायला मिळाल्या. विजयच नाव आलं की मी त्याला दिसेल असं उभा राहत होतो, मग कुस्ती केली की हा वाघ पळत माझ्याकड यायचा.पाया पडायचा. अतिशय विनम्र पोरगा होता तो. दोन मैदानात असं झालं की आमच्या गावातील एकही माणूस तिथं कुस्त्या बघायला नव्हतं. तेव्हाही विजूला मी भेटलो. कुस्तीच काहीही होवो पण त्याच्या चेहऱ्यावर जे स्मित असायचं ते विजू किती निरागस पोरगा आहे याचंच दर्शन घडवायचं. अतिशय भाबडा होता तो.

Loading...

मी एक दिवस कोल्हापूरच्या स्टँडवर बसलेलो. अचानक तिथं विजू आला.आणि प्रेमानं आलिंगन दिलं. धिप्पाड शरीरयष्टीचा,विनम्र स्वभावाचा विजू भेटला तरी किती समाधान वाटायचं. त्याच्यासोबत नुसतं फिरायलाही बर वाटायचं. त्याचसोबत कुठंही गेलं तरी माणस या रुबाबदार पोरांकडे बघतच रहायची. बघत रहावं असाच होता तो.आम्ही पुण्यातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना घेऊन कोल्हापूरच्या तालमी बघायला गेलो होतो. तेव्हा विजून धावपळ करत आम्हाला तालमी दाखवल्या. अनेक पैलवनाची ओळखी करून दिल्या. पोर विचारतील त्या प्रश्नांची उत्तरं दिली. आम्ही काही तासच त्याच्यासोबत होतो पण त्या वेळातच तो सगळ्यांचा लाडका बनला. अगदी सगळीच पोर विजूला”पुण्याला ये “अस म्हणायला लागली. माणस अशी जोडायचा विजू.

मला तो अधूनमधून फोन करायचा , फार कमी बोलायचा.”सर,तुम्हाला फोन केला की लै बर वाटत. “म्हणायचा.त्याची आणि माझी घट्ट दोस्ती झालेली. वयात अंतर होत तरी मैत्रीचे धागे मात्र मजबूत विणले होते.मला विजूचा अभिमान वाटायचा. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण
परवा रात्री विजू आणि त्याचे सहकाऱ्या वर काळाने झडप घातली.मोठा अपघात झाला . त्या अपघातात आईबापांनी आणि वस्तादांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पैलवान पोरं त्या काळ्याकुट्ट रात्री अक्षरशः टाचा घासून मेली. उद्याच्या महाराष्ट्राच भविष्य असणारी पोर बघता बघता आपल्यातून निघून गेली. कोणी कोणाची समजूत काढायची?रडून रडून डोळे सुजले होते तिथं आले होते बघायला त्यांचे.
विजू गेल्याची खबर गावात आली. एक शोककळा पसरली गावावर. एक वयोवृद्ध म्हातारी काठी ठेकत विजूच्या घराकडं विजूला बघायला आली होती ती म्हणाली,”देवा, आमच्यासारख्याला माग ठेवून त्या बाळाला का नेलस र?”तिच्या त्या शब्दांनी गहिवरलो. किन्नर बापू म्हणत होते,”एवढा ताडमाड गडी पण मान वर करून चालत नव्हता. दिसलं त्याला नमस्कार करायचं प्वार. लय गुणांचं हुत?”


विजयचा अंत्यसंस्कार करताना त्याचे वडील शिवा नाना हंबरडा फोडत म्हणाले,”पोरा,काळीज मागितलं असतंस तरी दिल असत. हे काय झालं रं.”पोराच्या जाण्यानं कोलमडून गेलेल्या बापाचं वाक्य ऐकलं आणि आपोआपच माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. कुस्तीच्या आखाड्यात शेकडो मैदान जिंकलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादालाही भरून आलेलं.त्याला शब्द फुटत नव्हते. दुःखावेगान बोलता येत नव्हतं. विजूच्या आठवणी सांगत त्याच्या सोबतची मोतीबाग तालमीतील पोर ढसाढसा रडत होती. विजूचं समजल्यावर मिळेल त्या वाहनांन थंडी वाऱ्याची पर्वा न करता ती पोर आलेली. हबकून गेली होती. विजूला मी म्हणत होतो “,तू मोठी कुस्ती केलीस की तुझी गावातून मिरवणूक काढायची.”विजू स्मित करायचा. निरागस हसायचा. “व्हय सर” पण विजूची मिरवणूक काढायची संधी आम्हाला मिळाली नाही. त्यांची अंत्ययात्रा पहाण्याच दुदैव वेळ आमच्यावर ओढवली.आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस आमच्यासाठी उगवला ,या दिवशी एक उगवता तारा आमच्यातून कधीही परत न येण्याच्या वाटेला गेलाय. हे दुःख कस पचवायचं?

लेख – संपत मोरे