काय बोलले तीनही घराण्याचे छत्रपती वाचा थोडक्यात

मराठा सेवा संघ आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात सिंदखेडराजा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला लाखोचा जनसागर लोटला होता या कार्यक्रमात या वर्षी सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे , कोल्हापूर गादीचे युवराज छत्रपती संभाजीराजे आणि तंजावर येथील छत्रपती बाबाजीराजे भोसले हे उपस्थित होते. तीनही भाऊ एकत्र विचारपीठावर आल्याने एक चांगला संदेश गेला. काय बोलले हे तीनही छत्रपती वाचा थोडक्यात
शिवरायांचे विचारच देशाला तारु शकतात!
सध्या सत्तेत कोण आहे किंवा कोण नाही, याला आपण महत्त्व देत नाही. राजकारणी लोक महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून भलत्याच विषयांचा बाऊ करतात. असेच राहिले तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. व्यक्ती स्वार्थ आणि द्वेषापोटी तरुणाईसमोर अवडंबर माजविले जात आहे. जाती, धर्म भेद संपुष्टात आणण्यासाठी माँ जिजाऊ आणि शिवरायांचे विचारच देशाला तारू शकतात, असे त्यांनी सांगितले.तसेच सरकारने ३ वर्षापूर्वी सिंदखेडराजासाठी जो काही निधी जाहीर केला होता त्याची माहिती घेऊन तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.
– छत्रपती उदयनराजे भोसले

Loading...

तंजावरमध्ये या, संस्कृती जोपासा!
तामिळनाडूतील तंजावरमध्ये या. तेथे तमिळ आणि मोडी लिपीतील लाखो दस्तावेजांमध्ये मराठा समाजाचा दैदिप्यमान इतिहास सामावलेला आहे. तो आपला सर्वांचा आहे. त्याचे जतन करून संस्कृती जोपासण्याची आपल्याला गरज आहे. आपल्या सर्वांचा हा इतिहास तिथे जिवंत ठेवलेला आहे, असे छत्रपती बाबाजीराजे भोसले म्हणाले.
– छत्रपती बाबाजीराजे भोसले

शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र असून त्यांच्या रक्ताचे वारसदार होण्याऐवजी त्यांच्या विचारांचे वारसदार होणे आवश्यक आहे, असे मत छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी व्यक्त केले. यंदाची शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करणार असून राजधानी दिल्लीत दिमाखदार हा सोहळा व्हावा म्हणून पुढाकार घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिजाऊसृष्टीवर ग्रंथालयासाठी ५० लाख रुपयांच्या निधीचीही घोषणा त्यांनी केली. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा सखोल अभ्यास बहुजन समाजातील नव्या पिढीने करावा. कोरेगाव भीमासारख्या घटना मनाला वेदना देणाऱ्या असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. शिवरायांच्या या महाराष्ट्राला कुठेही गालबोट लागू देऊ नका, असे आवाहन करताना त्यानी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी उद्योगपतींकडे साकडे घालणार असल्याचे म्हटले.
– छत्रपती संभाजीराजे भोसले